काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Posts tagged ‘review’

शाळा

एकदा पुस्तक वाचायला घेतल्यावर खाली ठेवू नये असे वाटणार्‍या काही निवडक पुस्तकांपैकी ‘शाळा’ हे मिलिंद बोकील ह्यांचे एक अप्रतिम पुस्तक.

थोडक्यात गोष्ट अशी आहे:
मुंबई जवळ एक छोटं  गाव असतं. जोशी (हा कथेचा नायक) आणि त्याचे मित्रं (सुर्‍या, चित्र्या, फावड्या) नवव्या वर्गात शिकत असतात. त्यांच्या एका शैक्षणिक वर्षाची ही कहाणी. शाळेत बॅकबेनचर्स म्हणून ओळखले जाणारा जो गट असतो, त्यापैकी हे. शाळेतली मस्ती, मुलिंबद्दल वाटणारं आकर्षण, अभ्यासातली स्पर्धा अश्या विविध प्रसंगातून त्यांचे अन्तरंग उलगडत जातात. अश्यातच जोश्याला एक मुलगी (शिरोडकर) आवडायला लागते.
मग काय, वर्गात तिच्याकडे चोरून बघणे, तिच्या घरासमोरून फेर्‍या मारणे, तिनि लावलेली शिकवणी लावणे, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे असे अनेक उपद्व्याप जोशी करतो. स्नेहासंमेलन आणि शिबिरांमधे हळूहळू त्यांची मैत्री होते आणि एका सुट्टिच्या दिवशी जोश्या तिच्या घरी जाऊन तिला भेटून पण येतो.
परीक्षेच्या काही दिवस अगोदर सुर्‍या एका मुलीला प्रपोज़ करतो आणि हे शाळेत कळल्यावर सुर्‍या आणि जोशीला भरपूर मार बसतो. हा नाजूक प्रसंग जोशीचे वडील फार सुंदर रीतीने हाताळतात. आता परीक्षा जवळ आलेली असते आणि सगळे अभ्यासाला भिडतात. नव्वीचा निकाल लागतो आणि एक नाट्यमय वळण घेऊन कादांबरीचा शेवट होतो. शेवट मुद्दाम लिहिला नाही, तो वाचण्यात जास्ता मजा आहे.

निवडक प्रसंग/ उतारे-
1. जोशीला वर्गात शिरोडकरच्या नावाने चिडवल्यावर त्याचं वर्गात लक्ष लागत नाही आणि तो आपल्याच तंद्रित असतो “ त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरं पोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिक शास्त्र सुद्धा. पण आपण त्या कशातच  नाही. आपण त्या गाईच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्षा सारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसत असलो तरी आपल्या मनात एक वेगळीक शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत पण त्यातलं शिक्षण फार सुंदर आहे.”

2. कथेच्या शेवटी शिरोडकर आणि स्वताःचा विचार करत उजाड शेतात बसलेला जोशी म्हणतो “शाळा संपली होती. आता फक्त होतं दहावी नावाचं भयाण वर्ष.”

जमेची बाजू-  वाचक सहज एकरूप होतील असे शाळेतील नित्याचे प्रसंग, ओघवती लेखन शैली आणि सुसूत्रता. वेगवेगळ्या प्रकारची मुले (अभ्यासू, पापभिरू, वात्रट), शिक्षक (चिडके, प्रेमळ, रटाळवाणे), मुलांचे उद्योग (मुलींकडे पहाणे, शिक्षकांना चिडवणे, नावं ठेवणे) आणि शाळेतले नित्याचे प्रसंग (स्नेहसमेलन, हिवाळी शिबीर, परीक्षा) हे छान रंगवलेले आहेत. शेवट सुद्धा फार हृदयस्पर्शी आहे.

विशेष- केवळ पाच वर्षापूर्वी आलेल्या ह्या पुस्तकाची सातवी आवृती (मौज प्रकाशन गृह) निघाली असून ‘गमभन’ हे नाटक आणि ‘हमने जीना सीख लिया’ हा चित्रपट ह्या पुस्तकावरुन घेण्यात आला आहे.

Advertisements