काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Posts tagged ‘admission’

मराठमोळ्या कोथरूडमधे सगळ्या इंग्रजी शाळा!

पुण्य नगरी पुणे येथे नुकताच बालकमंदीर प्रवेशाचा हंगाम (pre school admission season) सुरु झाला. विशेषतः कोथरूडमधे लोकसंखेच्या तुलनेत शाळा कमी असल्याने चांगल्या शाळांचा अर्ज घेण्यासाठी पालकांना तासंतास रांगा लावाव्या लागतात.

सगळ्यात मोठे आश्चर्य म्हणजे कोथरूड सारख्या मराठमोळ्या भागात सगळ्या चांगल्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. पालक इंग्रजी माध्यमाचा आग्रह करतात म्हणून मराठी शाळा नाहीत की मराठी शाळा नाहीत म्हणून पालक नाईलाजाने इंग्रजी शाळांकडे जातात?

नळ स्टॉपला ‘अभिनव’ ही ४-५ की.मी. दूर असलेली कोथरूडच्या ‘सगळ्यात जवळची’ चांगली मराठी शाळा. बाकी न्यु इंडिया, मेलेनिम, परांजपे, सेवा सदन, सरस्वती, स्प्रिंग डेल अश्या सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. वासुदेव बळवंत फडकेंचा वारसा सांगणारी ‘बाल शिक्षण’ शाळा देखील ‘प्युर इंग्लिश’ आहे. ह्या शाळांना मराठी माध्यम नसल्याची जरासुद्धा खंत नाही उलट आपल्या इंग्रजी माध्यमाचा गर्व आहे.

‘सेमी इंग्लिश’ हा एक चांगला व्यवहार्य पर्याय असुनदेखील पेठांबाहेरील बहुतेक शाळांमध्ये ह्याची सोय नाही (अपवाद अभिनव विद्यालय). पालक सुद्धा विनाकारण इंग्रजीचा आग्रह धरतात. ‘अभिनव इंग्लिश’साठी रांगा लावणाऱ्या बहुतांश मराठी पालकांनी ‘अभिनव मराठी’चे माहिती पत्रक देखील घेतले नाही. मराठी माध्यमातून शिकणे त्यांना बहुतेक कमीपणाचे वाटते.

आज इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, पण म्हणून मराठीचा बळी देण्याची गरज नाही असं वाटतं.

Advertisements