काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Posts tagged ‘२६ जानेवारी’

राष्ट्रभक्तीचा संच-उपसंच

उद्या २६ जानेवारी. आपला गणतंत्र दिवस. राष्ट्रप्रेमाच्या नावावर ह्या विक्री आणि विपणन संधीचा पुरेपूर फायदा समाजातले वेगवेगळे घटक करून घेणार आहेत. उदा. दूरचित्रवाणीवर वेगवेगळे चित्रपट आणि गाण्याचे कार्यक्रम होतील, राजकीय नेते सांस्कृतिक मेळावे भरवतील, मॉल्समध्ये ह्या दिवशी खरेदीवर भव्य सुट असेल, आणि काही ‘राष्ट्रवादी’ मंडळी ह्या निमित्त दारू पिऊन रस्त्यावर शक्ती प्रदर्शनाचा धिंगाणा घालतील.

स्वतंत्र भारत देशाची राज्यघटना ह्या दिवशी अस्तित्वात आली आणि म्हणून आपण हा दिवस साजरा (?) करतो. वरील कार्यक्रम ह्या दिवसाला कितपत सुसंगत वाटतात? आणि मुळात आपली राष्ट्रभक्तीची व्याख्या काय? तिरंगा झेंडा शर्टावर किंवा गाडीवर लावणे? थोडा वेळ राष्ट्रभक्तीपर गाणे ऐकणे? क्रिकेटमध्ये भारत जिंकल्यावर आनंदित होणे?

ह्या गोष्टी राष्ट्रभक्तीचा केवळ एक छोटासा उपसंच आहेत आणि आपल्या सर्वांमध्ये तो एक समान दुवा आहे, गणितात मसावी असतो तसा. पण राष्ट्रभक्तीचा परीघ ह्यापेक्षा कितीतरी मोठा आहे.  उदा.

  1. चीन हे आपलं शत्रू राष्ट्र आहे ह्यात काही वाद नाही. तरीही आपण चीनी वस्तू विकत घेतो आणि शत्रूराष्ट्राला मदत करतो. काही भ्रष्ट अधिकारी निकृष्ठ दर्जाचा चीनी माल आयात करायला परवानगी देतात आणि आपण त्या बाबतीत काही फार करू शकत नसलो तरी निदान त्या वस्तू विकत न घेऊन आपण देशाचं आर्थिक आणि पर्यावरणाचं नुकसान टाळू शकतो.
  2. आज आपल्याला पाणी आणि विजेची समस्या भेडसावते आहे. मुंबई पुण्याला ही समस्या उग्र नसली तरी इतर ठिकाणी १२ तास वीज अधिनियम आहे. काही ठिकाणी आठवडयातून एकदा पाणी येतं. अश्या परिस्थितीत आपण निदान वीज आणि पाण्याचा अपव्यय टाळू शकतो ना?
  3. सार्वजनिक अस्वच्छता हा काही नवीन विषय नाही. केवळ पान थुंकणारे ह्याला जवाबदार धरले जातात. कार मधून रस्त्यावर प्लास्टीक आणि शीतपेयांच्या बाटल्या भिरकावल्या जातात. अलिबागच्या किनाऱ्यावर दारूच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. हे आपल्यातलेच काही सुशिक्षित लोक करत असतात.    
  4. भ्रष्ट्राचाराविरुद्ध आपण सगळे ओरडत असतो पण रेल्वेमध्ये जागा मिळवायला किंवा वाहतूक पोलिसांना चिरीमिरी देवून आपली सुटका करून घेणारे आपल्यातलेच असतात ना?

 कितीतरी साध्या सोप्या गोष्टींचा विचार करून देशासमोर असलेल्या काही ठळक समस्या (त्यात भर न घालता) सोडवण्यासाठी आपण आपला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. आपल्या कृतीतून समाजाचे किंवा देशाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही अशी आपण खबरदारी घ्यायला हवी. राष्ट्राभाक्तीला पूरक असलेल्या आपल्या कृतींवर समाधान न मानता आपण आपल्या राष्ट्रभक्तीचा परीघ वाढवायला हवा. एक सुजाण आणि जवाबदार नागरिक बनून राष्ट्रभक्तीच्या शिडीवर आपण एक पायरी आणखी वर जाण्याचा आज संकल्प करुया. जय हिंद!

Advertisements