काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Posts tagged ‘विष्णू दिगंबर’

परि तू जागा चुकलासी

नुकतंच पुलंचे मैत्र हे पुस्तक वाचलं आणि भ्रमनिरास झाला. पंडित विष्णू दिगंबर ह्यांच्यावरील लेखात अनेक ठिकाणी पुलं गांधर्व महाविद्यालयासंदर्भात नाराजी व्यक्त करतात.  पूर्ण लेख वाचून झाल्यावर प्रश्न पडतो की इतका नकारात्मक लेख पुलंनी का लिहिला असेल. मला खटकलेले काही ठळक संदर्भ:

“पंडित विष्णू दिगंबरांनि संगीतात धर्म आणला”- संगीत शिक्षणाला प्रतिष्ठा मिळवून देणे हे त्यांचे जीवित कार्य होते. गायक, उस्ताद म्हणजे व्यसने असलेला अशी त्या काळी समजूत होती, सभ्य लोक संगीताकडे पाठ फिरवत.. अश्या वेळी संगीतातले पावित्र्य लोकांना दाखवून संगीत शिक्षणाला अनुकूल वातावरण तयार करण्याचे अवघड काम पंडितजी करू शकले ते केवळ धार्मिक अधिष्ठानाच्या जोरावर लोकांना आकृष्ट करून. पुलंचं साहित्य वाचून कितीतरी चांगले लेखक निर्माण झाले असतील, पण पुलंना ‘तुम्ही किती साहित्यिक निर्माण केले’ हे विचारणं कितपत शाहाणपणाचं ठरलं असतं?

“गांधर्व महाविद्यालय महान गायक तयार करू शकले नाही”– संगीत लोकांपर्यन्त पोचवणे हे पंडितजींचे धेय्य होते, गायक निर्माण करणे नव्हे. एकदा समाजात संगीताला पोषक वातावरण निर्माण झाले की चांगले गायक आपोआप समोर येतात, मग ते गांधर्व महाविद्यालयातून असोत अथवा सारेगमप  मधून असोत. पुलंचा मित्र परिवार मोठा होता. पण गांधर्व महाविद्यालयाशी त्यांची विशेष जवळीक नसावी (देवधरांसारखे काही अपवाद वगळता). आणि म्हणून गांधर्व महाविद्यालयाच्या केवळ उणीवा दाखवणे त्यांनी पसंत केले असावे.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गावोगाव शाखा काढून एकाच वैचारिक साच्यातील व्यक्ती निर्माण करण्याचा जो उद्योग केला तसलाच हा प्रकार होता”– संगीताचा इतका व्यापक प्रचार आणि प्रसार गुरू-शिश्य परंपरेतून होणे शक्य नव्हते, त्यासाठी संघटनात्मक व्यवस्थेची गरज होती. हे पुलंनी देखील लेखात एका ठिकाणी मान्य केलं आहे. मग ह्या वाक्याची काय गरज होती? पुलं हे समाजवादी. स्वातंत्र्योत्तर काळात समाजवादी लोकांचे झालेले स्वप्नभंग (म्हणूनच साने गुरूजींनी आत्महत्या केली), समाजवादाचा झालेला ह्रास (पर्वतीच्या पायथ्याशी आता केवळ समाजवादी नेत्यांच्या नावाच्या झोपाडपट्ट्या उरल्यात) आणि संघाच्या ‘गोळ्वलकर’ गुरुजिंबद्दलचा मत्सर ह्या वैफल्यातून वरील टिप्पणी आली आहे.

गंमत म्हणजे ह्याच पुस्तकातील केसरबाई केरकर ह्यांच्या लेखामधे पुलंनी त्यांची तोंड भरून स्तुती केली आहे. आणि असे करत असतांना त्यांच्या उणीवा (लोकांकडे मेहेरबानी केल्यासारखे पहाणे, मैफीलीत रागाचे नाव न सांगणे) पूर्णत: दुर्लक्षित केल्या आहेत. आणि असं करण्याचं कारण म्हणजे पुलंचे केसरबाईशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध. 

एक प्रसिद्धा लेखक जेव्हा व्यक्तिचित्र लिहितो तेव्हा ते वैयक्तिक मानापमान आणि राग-लोभ बाजूला सारून लिहीणे अपेक्षित असते. दुर्दैवाने सदर लेखात पुलंची राजकीय मते अकारण उफाळुन आली आणि म्हणून म्हणावेसे वाटले: तुझे (मत) आहे तुजपाशी …परि तू जागा चुकलासी.

Advertisements