काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Posts tagged ‘फायदा’

माझे सट्याचे प्रयोग- १ (सुवर्ण भिशी)

गावाकडे आठवडी बाजारात लोक कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावत, जसे शहरात लोक घोड्याच्या शर्यतीवर लावतात. मी अजून तरी प्राण्यांच्या शर्यतीत, मटका, तिन पत्ते इ. ठिकाणी कधी पैसे लावलेले नाहीत. पण गेल्या काही वर्षातील आर्थिक गुंतवणुकीचा आढावा घेतला तर मी ‘हावरट माणसांवर’ पैसे लावून जुगार खेळलो असं वाटतं.

विमा , म्युचल फंड असो वा सोनं असो, गुंतवणूक पर्यायांची आपल्याला केवळ मर्यादित माहिती असते, आणि अधिक परतावा मिळावा म्हणून आपण एक प्रकारचा जुगारच खेळत असतो. गेल्या काही वर्षात मला आलेले अनुभव आणि मला समजलेलं गुंतवणूकीचं गुंतागुंतीचं गणित क्रमशः इथे मांडतो आहे:

सोनं ते सोनं –  सोन्यासारखी सुरक्षित गुंतवणूक नाही असं म्हणतात, अपवाद- chain snatching, घरफोडी 🙂  हल्ली सुवर्ण भिशी हा पर्याय बायकांमध्ये खूप प्रिय आहे. तुम्ही १२ महिने पैसे भरले की सराफ तुम्हाला १३ व्या महिन्याचा हफ्ता देतो आणि तुम्ही १३ महिन्याच्या रकमेवर दागिने घेता.

१२ महिन्यावर १ महिना म्हणजे तुम्हाला ८.३ % परतावा मिळतो. पण हे पैसे तुम्हाला दागिन्यांवर खर्च करावे लागतात ज्यात १०० रु. ग्राम मजुरी असते. दुसरं म्हणजे सोन्याच्या भावात वार्षिक १५ ते २५ % वाढ होते, म्हणजे भिसी सुरु करतांना आपण ५० ग्रामसाठी पैसे भरले तर भिसी संपतांना आपल्याला केवळ ४० ग्राम सोनं घेता येईल. आपल्याला वाटतं सराफांनी आपल्याला १ महिन्याचा हफ्ता दिला, पण प्रत्यक्षात आपला ३-४ महिन्यांचा हफ्ता वाया जातो.

मी जानेवारी २००९ मधे भिसी काढली, त्याऐवजी एकरकमी गुंतवणूक केली असती तर माझं नुकसान झालं नसतं:

म्हणून, सोन्यात गुंतवणूक करायची असल्यास एकरकमी करावी. आणि नाणे घेण्यापेक्षा केवळ कागदोपत्री सोनं खरेदी करून ते सराफाकडे जमा ठेवावं. ह्यात coin making charges आणि locker charges वाचतात. गरज पडेल तेव्हा ही जमा पावती दाखवून सोनं/पैसे परत घेता येतील.

ज्यांना लग्नकार्यासाठी भरपूर सोनं खरेदी करायचं आहे आणि आज १-२ लाख गुंतवणे शक्य नाही त्यांनी भिशीच्या मार्गाने जावे. त्यातही ११ महिन्यांवर १ महिना देणारा सराफ बघावा (उदा. तनिश्क). १२ वर १ पेक्षा ११ वर १ जास्त फायद्याचं!

 

क्रमशः

Advertisements