काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Posts tagged ‘पेट्रोल’

व्यवसायजन्य भ्रष्टाचार – १

मध्यंतरी भ्रष्टाचार विरोधी वातावरण तापलं होतं. त्या पार्श्वभुमीवर विविध क्षेत्रात होणाऱ्या (व्यवसायजन्य) भ्रष्टाचाराची माहिती देण्याचा हा प्रयत्न.

सध्या पेट्रोल दर-वाढीने आपण त्रस्त असल्याने तेल क्षेत्र निवडूया. भेसळयुक्त पेट्रोल आणि डिझेल ह्या प्राचीन गोष्टी असुन त्या आता जनमानसात रुळल्या आहेत. त्यामुळे भेसळ रहित तेलाची आपण अपेक्षा सुद्धा करत नाही. पण तेलाला भेसळीशीवाय आणखी अनेक रंजक पैलू आहेत.

थेंबे थेंबे तळे साचे- एक एक पॉइंट मारून महिन्याचा पगार काढणे ही पंपावरच्या लोकांची जुनी सवय. पण काही महत्वाकांक्षी कर्मचारी लिटर लिटर पेट्रोल मारतात. कार मधील लोकांचं लक्ष नसतांना पेट्रोलची नळी काढून जवळच्या डबकीत काही लिटर पेट्रोल भरून नळी पुनः गाडीच्या टाकीत टाकणारे महाभाग आहेत ( उदा. पुण्यातील चतुश्रींगी समोरील पंप). प्रत्येक गाडीत पेट्रोल भरतांना मागील गाडीच्या मीटर रीडिंग पासून सुरवात करण्याची परंपरा कर्वे पुतळ्याशेजारचा पंपावर आहे.

खाजगीतलं सार्वजनीक गुपीत- खासगी पंप ७० रु दराने खाजगी कंपन्यांचे पेट्रोल घेवून ७३ रु. लिटरने विकतात. सरकार आपल्याला अनुदान देते म्हणून सार्वजनीक कंपन्या (Indian Oil, HP, Bharat) ६५ रु.चे पेट्रोल आपल्याला ६७ रु. दराने विकतात. त्यामुळे काही व्यवहारी पंप मालकांनी त्यांच्या खाजगी कंपनीचे ७० रु. चे पेट्रोल घेण्याऐवजी सरकारी कंपन्यांचे ६५-६७ रु.चे पेट्रोल घेवून ते आपल्या नावावर (Essar/Reliance/Shell) ७३ रु.नी विकणे सुरु केले. ह्यावर कडी म्हणजे काही भाऊ-दादा लोकांनी एक खाजगी आणि एक सरकारी पंप आपल्या ताई-माईच्या नावावर घेऊन इकडचे पेट्रोल तिकडे असा उद्योग सुरु केला आहे. ह्याला म्हणतात बिझनेस माइंड!

कुणाच्या खांद्यावर कुणाचे आझे- पेट्रोल अति पेरीशेबल असल्याने एका ठिकाणहून दुसरीकडे नेतांना भरपूर पेट्रोल वाया जाते. पण ठआची जवाबदारी सगळे लोक पुढच्यावर टाकतात. ONGC जेव्हा भारत पेट्रोलीयमला १००० लिटर पेट्रोल पाठवते तेव्हा भारत पेट्रोलीयमला केवळ ९५० लिटर मिळते पण पैसे १००० लिटर चे द्यावे लागतात. मग भारत जेव्हा आपल्या पंपावर पेट्रोल पाठवते तेव्हा त्या ९५० चे ९०० लिटर झालेले असतात पण कागदोपत्री मात्र १००० लिटरची नोंद असते. हे ९०० लिटर पेट्रोल साठवून एकेका वाहनात भरतांना केवळ ८५० लिटर भरते. मग ह्या हरवलेल्या १५० लिटर पेट्रोलचे नुकसान भरून काढण्यासाठी भेसळ, मोजमापात अफरातफर असे उपद्व्याप केले जातात. आणि शेवटी पंपावर ह्या ८५० लिटर पेट्रोलची ११०० लिटर विक्री होते!

तर अशी आहे तेलाची गोष्ट. आपण त्यातल्या त्यात खात्रीच्या पंपावर पेट्रोल भरून स्वतःची गाडी वाचवू शकतो. बाकी काही करणं लोकशाहीत शक्य नाही.

Advertisements