काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Posts tagged ‘पुस्तक’

प्रभाकर पेंढारकरांचं ‘चक्रीवादळ’

प्रभाकर पेंढारकर ह्याचं काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये निधन झालं. त्यांची ‘रारंगढांग’ आणि ‘एका ‍‌स्टुडीओचे आत्मवृत्त’ ही पुस्तकं जरी विशेष गाजली असली तरी मला त्यांचं वेगळेपण जाणवलं ते ‘चक्रीवादळ’ ह्या पुस्तकात. एखादी कथा गुंफणं म्हणजे काय हे मला ‘चक्रीवादळ’ वाचून जाणवलं. त्यांच्या स्मृतीपित्यर्थ ह्या कोलाज पद्धतीत लिहिलेल्या पुस्तकाचा थोडक्यात परिचय:

आंध्र प्रदेशला १९७० साली एका भयंकर चक्रीवादळाचा फटका बसला. वादळापूर्वी एक दिवस ते वादळानंतर १ महिना ह्या कालावधीत घडलेल्या काही सत्य तर काही काल्पनिक घटना एकत्र गुंफून ही कादंबरी तयार झाली आहे. एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी काय घडामोडी घडत आहेत हे चक्राकार गतीने पुस्तकात आपल्यासमोर येत असते.

सुरवातीला हवामान खाते, सचिवालय, एक रेल्वे आणि एक मालवाहू जहाज ह्या ठिकाणी वादळापूर्वी काय चित्र असतं आणि वादळ आल्यावर त्यात कसा बदल होतो ह्याचं चित्रण आहे. पुढे वादळाच्या तडाख्यात सापडलेली काही गावे, राज्य आणि केंद्र सरकार, मदतकार्य करणारे विविध गट ह्यांच्या घडामोडी आहेत. ह्या कादंबरीतील काही आवर्जून वाचण्यासारखे प्रसंग असे आहेत:

हवामान खात्याला अत्याधुनिक यंत्रणा बसवायची असते. पण हवामान खाते केंद्र सरकारचे असते तर ज्या ठिकाणी ही यंत्रणा बसवायची असते ती जागा राज्य सरकारची असते. लालफितशाहीमुळे ह्या विषयावरची फाईल पुढे सरकत नाही तेव्हा लेखक म्हणतो “ह्या चक्रीवादळाने गावंच्या गावं उलथून टाकली असली तरी एका टेबलवरची फाईल पुढच्या टेबलवर सरकवण्याचं बळ ह्या वादळात नाही”

प्रलयात अडकलेल्या लोकांना अन्न पाठवण्यासाठी वायू दलाची मदत घेण्यात येते. पण राष्ट्रपतींचा दौरा असल्याने अन्न घेवून जाणाऱ्या विमानाला उड्डाणासाठी वाट पाहत बसावे लागते. अन्नाची पाकीटं खराब होत असलेली पाहून वायू दलाचा पायलट नागरी नियंत्रण कक्षाला विचारतो की अन्न खराब झाल्यावर वाटायचं का? तो विना परवानगी उड्डाण करण्याची धमकी देतो तेव्हा त्याला नियंत्रण कक्ष उड्डाणाची परवानगी देतो.

सरकारने केवळ अन्न पुरविण्याचे नियोजन केले असते. पण वादळामुळे सगळीकडे समुद्राचे पाणी शिरले असते आणि प्यायच्या पाण्याची कुठेच सोय नसते. कित्येक लहान मुलांना दुध हवे असते पण सरकारने दुध-पाणी वाटण्याचा विचारच केला नसतो. (अजूनही अश्या आपत्तीमध्ये केवळ पुरी-भाजीचीच पाकीटं पुरविली जातात)

काही स्वयंसेवी संस्था गावांचे पुनर्वसन सुरु करतात. सगळीकडे चिखल आणि खारे पाणी असल्याने गावातली प्रेतं कुठे आणि कशी जाळायची अशी समस्या निर्माण होते. वादळात अडकलेल्या असहाय्य लोकांना मदत करून काही मिशनरी संस्था धर्मांतरण सुरु करतात. तिकडे ‘राज्य सरकार ह्या आपत्तीचा सामना करू शकत नाही’ असा प्रचार करून तेथे राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव केंद्र सरकार खेळत असते.

दिल्ली मधून विद्यार्थ्यांचा एका गट मदत कार्य बघायला आला असतो. त्यातील एक श्रीमंत घरची मुलगी लोकांचं असहाय्य जगणं बघून बधीर होते. केवळ लोकांशी बोलूनही त्यांना आधार देता येतो हे बघून ती आणखी काही काळ तेथेच राहून मदतकार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेते.

आपण वादळ-पूर ह्यांच्या बातम्या वाचल्या असतील. पण एखाद्या नैसर्गिक आपत्तीची व्याप्ती खरच किती मोठी असते आणि त्याचा सामान्य जनतेवर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी ‘चक्रीवादळ’ एकदा तरी वाचायला हवं.

Advertisements