काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Posts tagged ‘दीन’

महिला दीन – ‘करिअर ब्रेक’ साठी ‘करिअर पाथ’

महिलांनी आपले हक्क मिळविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे स्मरण करण्यासाठी ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. महिलांची व्यावसायीक आणि सामाजीक उन्नती ही निश्तितच अभिनंदनीय आहे. पण नवीन संधी नवीन समस्या घेवून आल्या आहेत आणि अशी एक समस्या आज माझ्या मनात घोळते आहे.

नोकरी आणि कौटुंबीक जवाबदारी ह्यांमधील द्वंद्व हा काही नवीन विषय नाही. विशेषतः महिलांवर कौटुंबीक जवाबदारी जास्त असल्याने प्रसुती आणि बाल संगोपन, मुलांचे शिक्षण अश्या कारणांमुळे त्यांना तात्पुरती नोकरी सोडावी लागते. बहुतेकदा २ ते ३ वर्षानंतर पुन्हा नोकरी करायला परिस्थिती पूरक बनते. पण अश्या महिलांना परत नोकरीत घेण्याची कुठलीही व्यवस्था कंपन्यांमधे नसते. अश्या वेळी परत नोकरी मिळवणे अवघड होवून अथवा चांगली नोकरी न मिळाल्याने बहुतेक महिला नोकरीचा विचार कायमचा सोडून देतात. ह्यामुळे महिलांचे वयक्तिक नुकसान तर होतेच पण त्याबरोबर उद्योगसमूहानी विकसीत केलेले कुशल मनुष्यबळ देखील वाया जाते.

सध्या रोजगार निर्मिती जोरात असल्याने उद्योगसमूहांना कुशल मनुष्यबळाची समस्या भेडसावते आहे. अश्यावेळी महिला कर्मचाऱ्यांमधील एक वर्ग पूर्णतः दुर्लक्षित राहतो हा केवढा विरोधाभास! गेल्या काही वर्षात कंपन्यांमध्ये ह्या विषयी थोडी जागरूकता निर्माण झाली आहे. आणि कौटुंबीक जवाबदारी पार पाडण्यासाठी ‘फ्लेक्झी अवर्स’ आणि ‘घरून काम’ अश्या सुविधा महिला कर्मचाऱ्यांना मिळण्यास सुरवात झाली आहे. पण मोठा ‘करिअर ब्रेक’ घेणाऱ्या वर्गाची समस्या ह्याने सुटत नाही.

ह्यावर एक चांगला उपाय म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये/ कंपन्यांमध्ये ‘पुनर्प्रवेश’ कार्यक्रम हाती घेणे. कंपन्यांनी अशी व्यवस्था निर्माण करावी की ज्यात मोठा ‘करिअर ब्रेक’ घेणाऱ्या महिलांसाठी वेगळे ‘करिअर पाथ’ उपलब्ध असतील. ह्यामुळे ‘करिअर ब्रेक’ घेणे आणि करिअर पुनः सुरु करणे सुलभ होईल. विशेषतः माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये ‘तांत्रिक आणि व्यवस्थापन’ असे दोन भिन्न ‘करिअर पाथ’ स्पष्टपणे नमूद केलेले असतात. त्यामुळे ‘HR’ ला असे ‘करिअर पाथ’ तयार करणे सहज शक्य आहे. गरज आहे ती इच्छाशक्तीची!

आणि हे काही स्वप्नरंजन नव्हे. काही कंपन्यांनी हे यशस्वीरीत्या करून दाखवले आहे. उदा. GE ह्या अग्रगण्य कंपनीने २००८ साली बंगरूळ मध्ये नोकरी सोडलेल्या उच्च शिक्षित महिलांसाठी ‘ReStart’ नावाचा कार्यक्रम राबवला. त्यात त्यांना उच्च तांत्रिक ज्ञान असलेल्या १००० पेक्षा जास्त महिलांकडून प्रतिसाद मिळाला. हरियाणा सरकारने नुकतीच महिला कर्मचाऱ्यांसाठी २ वर्षांची ‘बाल संगोपन’ रजेची सुविधा जाहीर केली आहे. हे उपक्रम स्तुत्य असून अश्या सुविधा इतर कंपन्यामध्ये उपलब्ध व्हायला हव्यात. कर्मचाऱ्यांनी हा विषय लावून धरला तर पुढच्या महिला दिनाआधी अशी सुविधा आणखी कितीतरी कंपन्यांमध्ये उपलब्ध होवू शकतील. तान्ह्या मुलांना पुरेसा वेळ देवू न शकण्याची खंत बाळगणाऱ्या कितीतरी महिलांना ह्यामुळे मोठा आधार मिळेल. 

Advertisements