काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

आपल्यापैकी बहुतेकांना स्क्रॅबल हा इंग्रजी स्पेलिंगचा खेळ माहिती असेल. ३ IITians नी सलग ४ वर्ष मेहनत करून ‘अक्षरित’ नावाचा असाच खेळ हिंदीमधे तयार केला आहे. कान्हा, मात्रा आणि जोडाक्षरांमुळे देवनागरीमधे स्क्रॅबल बनवणे हे फार अवघड होते, पण ह्या तिन मित्रांनी हे आव्हान समर्थपणे पेललं आहे.

IIT मधे हिंदी खेळ तयार करण्याच्या उद्देशाने सुरु झालेले हे प्रयत्न आता ‘मॅड रॅट’ ह्या खेळणे बनविणाऱ्या कंपनीच्या रुपाने फळाला आले आहेत. छत्तीसगढ सरकारने सर्वप्रथम आपल्या शैक्षणीक उपक्रमात ह्या खेळाला स्थान दिलं. सध्या १२०० ‘अक्षरित’ भारतातल्या विविध शाळांमधून खेळले जात आहेत. भाषा शिकण्यासाठी आणि शब्द संग्रह वाढविण्यासाठी ह्या खेळाचा उपयोग केला जात आहे.

नुकतचं नोकिया कंपनीने ‘अक्षरित’ मोबाईल अप्लिकेशन OVI स्टोअर मार्फत उपलब्ध केले आहे. पुढील वर्षी इतर भारतीय भाषांमध्ये ‘अक्षरित’ उपलब्ध होईल. अधिक माहिती http://www.aksharit.com/index.html येथे पाहू शकता.

मातृभाषा प्रेमाच्या केवळ गप्पा न मारता भाषेच्या विकासासाठी विधायक कार्य करणारा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे.

Advertisements

श्रद्धा

नुकताच एक गमतीशीर प्रसंग पाहण्यात आला. मी महामार्गाजवळ मित्राची वाट पाहात थांबलो होतो. माझ्या जवळून एक माणूस बाजूलाच असलेल्या चर्चच्या दिशेनी चालला होता.

वाट बघत कंटाळून गेल्याने आणि रस्त्यावर बघण्यासारखे काही नसल्याने मी उगाचच ह्या माणसाकडे बघत होतो. चर्चच्या दारात गेल्यावर ह्या माणसाने आपल्या चपला काढल्या आणि मेरीला नमस्कार केला. मला त्याचं ‘चपला काढण्याचं’ पहिले हसू आलं आणि मग वाईट वाटलं.

गावातल्या इतर चार चौघांसारखा दिसणारा हा इसम बहुतेक नव धर्मांतरित ख्रिश्चन होता. त्याने आपल्या पूर्वीच्या सवयीप्रमाणे चपला काढून देवाला नमस्कार केला. काही कारणाने त्याने देव बदलला होता पण देवपूजेचे जुने संस्कार मात्र त्याला बदलता आले नसावेत. ह्या धर्मात पूजा-प्रार्थना पादत्राणे घालूनच केली जाते हे बहुतेक त्याला माहिती नसावं.

सुटबुटात चर्चमध्ये शिरणाऱ्या इतर ख्रिश्चन मंडळींमधे हा नवीन ख्रिश्चन वेगळा वाटत होता. ह्या भोळ्या स-श्रध्द माणसानी आपला धर्म का बदलला असा विचार करत असतांना मित्र आला आणि मग विचारांचा तंद्री तुटली. कॅथलिक, प्रॉटेस्टंट, ऑर्थोडॉक्स आदी पंथांमध्ये विभागलेल्या आणि ३८००० पोटजाती असलेल्या धर्मात ह्याला काय वेगळा अनुभव येणार असा विचार करून मला त्या अनोळखी माणसाबद्दल वाईट वाटत राहिले.

 

ह्या वर्षी दबांग चित्रपटातलं ‘मुन्नी बदनाम हुवी’ हे गाणं बरंच गाजलं. आता फराहा खानच्या ‘तीस मार खा’ चित्रपटात ‘शीला की जवानी’ गाणं गाजतंय. फराहाने तर ‘शीला’ हे ‘आयटम साँग ऑफ दी इअर’ आहे असा प्रचार सुरु केला आहे.

हे गाणं ऐकायला छान असलं तरी बघतांना ‘आयटम साँग’ वाटत नाही. गाण्याचे शब्द, कतरीनाचे हावभाव आणि गाण्याचं चित्रीकरण ह्या सगळ्या गोष्टी ‘आयटम साँग’ म्हणून कमकुवत आहेत.

‘शीला की जवानी’ हे तीन शब्द सोडून गाण्याचा इतर भाग आयटम वाटत नाही. त्यात अर्धाधिक गाणं इंग्लिशमधे आहे. कतरीनाने (तिच्या मानाने) नाचायचा चांगला प्रयत्न केला आहे. पण तिच्या चेहऱ्यावर भावच नाहीत. नाच जमतो की नाही ह्या काळजीत बिचारी concious होवून नाचली असावी.

गाण्याच्या सेटवर रंगीत दिवे आणि रॉकेलच्या ज्वाळांनी परिणाम साधायचा प्रयत्न केला आहे, पण भोवतालची कुठलीही गोष्ट ‘आयटम साँग’ला पूरक नाहीये. दुर्दैव म्हणजे गाणं फ्लॉप असलं तरी शीला नावाच्या मुलींना ह्या गाण्याचा अकारण त्रास होणार.

‘बिडी जलायले’ आणि ‘मुन्नी बदनाम हुवी’ हे आयटम साँग म्हणून उत्कृष्ठ बनवले होते. ‘कजरा रे’ ऐश्वर्याला पूर्णपणे जमलं नसलं तरी अमिताभ आणि अभिषेकने गाणं उचललं होतं. ‘शीला’मधे दुर्दैवाने काहीच जमलं नाही. त्यामुळे आयटम साँग लव्हर्सला सध्या तरी ‘मुन्नी’ शिवाय पर्याय नाही.

 

पुण्य नगरी पुणे येथे नुकताच बालकमंदीर प्रवेशाचा हंगाम (pre school admission season) सुरु झाला. विशेषतः कोथरूडमधे लोकसंखेच्या तुलनेत शाळा कमी असल्याने चांगल्या शाळांचा अर्ज घेण्यासाठी पालकांना तासंतास रांगा लावाव्या लागतात.

सगळ्यात मोठे आश्चर्य म्हणजे कोथरूड सारख्या मराठमोळ्या भागात सगळ्या चांगल्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. पालक इंग्रजी माध्यमाचा आग्रह करतात म्हणून मराठी शाळा नाहीत की मराठी शाळा नाहीत म्हणून पालक नाईलाजाने इंग्रजी शाळांकडे जातात?

नळ स्टॉपला ‘अभिनव’ ही ४-५ की.मी. दूर असलेली कोथरूडच्या ‘सगळ्यात जवळची’ चांगली मराठी शाळा. बाकी न्यु इंडिया, मेलेनिम, परांजपे, सेवा सदन, सरस्वती, स्प्रिंग डेल अश्या सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. वासुदेव बळवंत फडकेंचा वारसा सांगणारी ‘बाल शिक्षण’ शाळा देखील ‘प्युर इंग्लिश’ आहे. ह्या शाळांना मराठी माध्यम नसल्याची जरासुद्धा खंत नाही उलट आपल्या इंग्रजी माध्यमाचा गर्व आहे.

‘सेमी इंग्लिश’ हा एक चांगला व्यवहार्य पर्याय असुनदेखील पेठांबाहेरील बहुतेक शाळांमध्ये ह्याची सोय नाही (अपवाद अभिनव विद्यालय). पालक सुद्धा विनाकारण इंग्रजीचा आग्रह धरतात. ‘अभिनव इंग्लिश’साठी रांगा लावणाऱ्या बहुतांश मराठी पालकांनी ‘अभिनव मराठी’चे माहिती पत्रक देखील घेतले नाही. मराठी माध्यमातून शिकणे त्यांना बहुतेक कमीपणाचे वाटते.

आज इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, पण म्हणून मराठीचा बळी देण्याची गरज नाही असं वाटतं.

नेहरूंना मुलं आवडायची म्हणून त्यांच्या जन्मदिवशी बाल दिवस साजरा करतात.  त्यांना लेडी माउंटबॅटन पण आवडायची, मग ह्या दिवशी प्रेम दिवस का साजरा करू नये?

बाई बाईत (माणसा-माणसात म्हणतो ना तसचं) भेदभाव न करता आंतराष्ट्रीय स्तरावर प्रेमाचा संदेश देण्याचा हा दिवस.

पामेला हिक्स (माउंटबॅटन ह्यांची कन्या) हिने आपल्या पुस्तकात नेहरू आणि तिच्या आईच्या प्रेमाचा उल्लेख केला आहे. नेहरू आणि एडविना माउंटबॅटन ह्यांना फार एकटं-एकटं वाटत होतं आणि त्यातून दोघं जवळ आले असं तिनी नमूद केलं आहे.

Reference:  India Remembered

Writers – Pamela Mountbatten-Hicks, India Hicks

Publisher- Pavilion, 2009

 

मुलं हे उद्याचे मतदार आहेत आणि त्यांना नेहरू-गांधी नावाचा विसर पडू नये म्हणून बहुतेक बालदिनाचे खुळ सुरु झाले. शाळेत असतांना ‘चाचांना गुलाब फार आवडे’, ‘चाचांना लहान मुले फार आवडत’ असे त्यांचे निरर्थक वर्णन करून ह्या दिवशी मिठाई वाटली जाई. मोठे झाल्यावर कित्येक लोकांना नेहरूंची तीच प्रतिमा लक्षात राहते आणि मग आपोआप ‘पंजावर शिक्का’ मारल्या जातो.

बाकी, ह्या नेहरू परिवाराने सर्वधर्मीय परिवाराचे एक उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवले आहे. हा त्यांचा वंशवृक्ष (वंशवेल म्हणा हवं तर)

परवा एका मासिकात ‘जागो ग्राहक जागो’ची जाहिरात बघून मी दिवाळीत केलेली खरेदी तपासून बघितली. आणि मग धक्के बसायला सुरवात झाली. कित्येक गोष्टींमध्ये मी चक्क फसवल्या गेलो आहे असं लक्षात आलं.  उदा:

ट्रॉपिकॅना – मी जे फ्रूट जूस म्हणून आणलं ते कृत्रिम जूस निघालं. बेवरेज/नेक्टर म्हणजे थोड्या पल्पमध्ये कृत्रिम रंग, गंध आणि साखर टाकून फळाच्या रसासारखं पेय तयार करतात. कंपनीच्या हेल्पलाईनला विचारल्यावर ते म्हणाले की पॅकवर ‘बेवरेज’ लिहिलं आहे, जूस असं लिहिलेलं नाही! मग मला कळलं की ‘बेवरेज म्हणजे जूस नसतं, आणि असं सगळ्या कंपनींच सेम असतं’

निहार अलमेंड ऑइल – विद्या बालनची जाहिरात आहे “goodness of five almonds”. ती हे तेल लावते म्हणून मी पण हेच विकत आणलं 😉 पण घरी येऊन कन्टेन्ट वाचतो तर काय आश्चर्य. ह्यामध्ये ९०% वनस्पती तेल आणि ९% इतर तेल आहे. ह्या ९% चा केवळ काही भाग बदाम तेल आहे. म्हणजे ५% पेक्षा कमी बदाम तेल असूनही हे बदाम तेल.  बाईमुळे चुकीची बाटली घेतल्या गेली आणखी काय?

कपडे- एका मॉलमधून शर्ट खरेदी केला. ८०० रुपयाचा शर्ट धुण्यासाठी ८ सूचना शर्टच्या स्टीकरवर लिहिलेल्या होत्या: गरम पाण्यात धुवू नका, उन्हात वाळवू नका, पहिल्या धुण्याआधी ड्रायक्लीन करा, उलट बाजूने इस्त्री करा… लहानपणी १००-२०० रुपयाचा शर्ट असायचा आणि आमची बाई तो दगडावर आपटून आपटून धुवायची. पण तरीही कपडे वर्षानुवर्ष टिकायचे. आता महागाचे ब्रांडेड कपडे धुवायला एवढे नाटकं आणि तरीही १ वर्षात त्यांचा रंग फेड होतो.

ब्रांडेड गोष्टींसाठी जादा पैसे देऊनही गुणवत्तेची खात्री नाही कारण ग्राहक (म्हणजे आपणच) अजूनही जागरूक नाही.

स्वतः फसवल्या गेल्यामुळे की काय पण माझं consumer awareness बद्दल कुतूहल जागृत झालं आहे. आपले काही अनुभव/ उपयुक्त माहिती असल्यास जरूर लिहावे.

 

प्रभाकर पेंढारकर ह्याचं काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये निधन झालं. त्यांची ‘रारंगढांग’ आणि ‘एका ‍‌स्टुडीओचे आत्मवृत्त’ ही पुस्तकं जरी विशेष गाजली असली तरी मला त्यांचं वेगळेपण जाणवलं ते ‘चक्रीवादळ’ ह्या पुस्तकात. एखादी कथा गुंफणं म्हणजे काय हे मला ‘चक्रीवादळ’ वाचून जाणवलं. त्यांच्या स्मृतीपित्यर्थ ह्या कोलाज पद्धतीत लिहिलेल्या पुस्तकाचा थोडक्यात परिचय:

आंध्र प्रदेशला १९७० साली एका भयंकर चक्रीवादळाचा फटका बसला. वादळापूर्वी एक दिवस ते वादळानंतर १ महिना ह्या कालावधीत घडलेल्या काही सत्य तर काही काल्पनिक घटना एकत्र गुंफून ही कादंबरी तयार झाली आहे. एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी काय घडामोडी घडत आहेत हे चक्राकार गतीने पुस्तकात आपल्यासमोर येत असते.

सुरवातीला हवामान खाते, सचिवालय, एक रेल्वे आणि एक मालवाहू जहाज ह्या ठिकाणी वादळापूर्वी काय चित्र असतं आणि वादळ आल्यावर त्यात कसा बदल होतो ह्याचं चित्रण आहे. पुढे वादळाच्या तडाख्यात सापडलेली काही गावे, राज्य आणि केंद्र सरकार, मदतकार्य करणारे विविध गट ह्यांच्या घडामोडी आहेत. ह्या कादंबरीतील काही आवर्जून वाचण्यासारखे प्रसंग असे आहेत:

हवामान खात्याला अत्याधुनिक यंत्रणा बसवायची असते. पण हवामान खाते केंद्र सरकारचे असते तर ज्या ठिकाणी ही यंत्रणा बसवायची असते ती जागा राज्य सरकारची असते. लालफितशाहीमुळे ह्या विषयावरची फाईल पुढे सरकत नाही तेव्हा लेखक म्हणतो “ह्या चक्रीवादळाने गावंच्या गावं उलथून टाकली असली तरी एका टेबलवरची फाईल पुढच्या टेबलवर सरकवण्याचं बळ ह्या वादळात नाही”

प्रलयात अडकलेल्या लोकांना अन्न पाठवण्यासाठी वायू दलाची मदत घेण्यात येते. पण राष्ट्रपतींचा दौरा असल्याने अन्न घेवून जाणाऱ्या विमानाला उड्डाणासाठी वाट पाहत बसावे लागते. अन्नाची पाकीटं खराब होत असलेली पाहून वायू दलाचा पायलट नागरी नियंत्रण कक्षाला विचारतो की अन्न खराब झाल्यावर वाटायचं का? तो विना परवानगी उड्डाण करण्याची धमकी देतो तेव्हा त्याला नियंत्रण कक्ष उड्डाणाची परवानगी देतो.

सरकारने केवळ अन्न पुरविण्याचे नियोजन केले असते. पण वादळामुळे सगळीकडे समुद्राचे पाणी शिरले असते आणि प्यायच्या पाण्याची कुठेच सोय नसते. कित्येक लहान मुलांना दुध हवे असते पण सरकारने दुध-पाणी वाटण्याचा विचारच केला नसतो. (अजूनही अश्या आपत्तीमध्ये केवळ पुरी-भाजीचीच पाकीटं पुरविली जातात)

काही स्वयंसेवी संस्था गावांचे पुनर्वसन सुरु करतात. सगळीकडे चिखल आणि खारे पाणी असल्याने गावातली प्रेतं कुठे आणि कशी जाळायची अशी समस्या निर्माण होते. वादळात अडकलेल्या असहाय्य लोकांना मदत करून काही मिशनरी संस्था धर्मांतरण सुरु करतात. तिकडे ‘राज्य सरकार ह्या आपत्तीचा सामना करू शकत नाही’ असा प्रचार करून तेथे राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव केंद्र सरकार खेळत असते.

दिल्ली मधून विद्यार्थ्यांचा एका गट मदत कार्य बघायला आला असतो. त्यातील एक श्रीमंत घरची मुलगी लोकांचं असहाय्य जगणं बघून बधीर होते. केवळ लोकांशी बोलूनही त्यांना आधार देता येतो हे बघून ती आणखी काही काळ तेथेच राहून मदतकार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेते.

आपण वादळ-पूर ह्यांच्या बातम्या वाचल्या असतील. पण एखाद्या नैसर्गिक आपत्तीची व्याप्ती खरच किती मोठी असते आणि त्याचा सामान्य जनतेवर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी ‘चक्रीवादळ’ एकदा तरी वाचायला हवं.