काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Archive for the ‘स्फुट’ Category

गोध्रा – अनुत्तरीत प्रश्न

आज गोध्रा  आणि गुजरात मधील दंगलींना १० वर्षे झाली.

त्यानिमित्त विविध वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिले गेले. पण मुळ मुद्दा कोणी जाणूनबुजून लक्षात घेत नाही.

दंगल उसळली कारण आगगाडीमध्ये काही लोकांना जाळून मारण्यात आलं होतं. गेल्या १० वर्षात किती मुसलमानांनी गोध्रा जळीतकांडाचा निषेध केला आहे?  ह्याचा अर्थ असा घ्यायचा का की मुसलमान नेत्यांना-लोकांना जळून मेलेल्या भारतीयांबद्दल काहीएक सोयरसुतक नाहीये आणि त्यांना ही हत्या समर्थनीय वाटते?

दंगल ही वाईटच होती पण ती दोन्ही धर्माच्या लोकांनी केली होती हे विसरून चालणार नाही. वृत्तपत्रात मात्र तुर्की टोपी घातलेल्या एखाद्या  मुसलमान इसमाचे चित्र दंगलपिडीत म्हणून दिले जाते. हजारो हिंदूंची घरे त्या दंगलीत जाळण्यात आली, पण ती चित्रे कधी कुठे दाखवल्या गेली नाहीत. ५०० चा वर हिंदूंची कत्तल झाली पण त्यांची रडणारी मुले कोणा चित्रकाराला कधी दिसलीच नाहीत का?

सरते शेवटी एक मुद्दा- अफझल गुरु आणि कसब हे केवळ मुसलमान आहेत म्हणून त्यांना फाशी द्यायला सरकार टाळाटाळ करत आहे. ह्याचा एकही भारतीय मुसलमानाला राग येवू नये का? त्यांना फाशी द्यावी अशी मागणी कधी कोण्या मुसलमान नेत्याने कधीच का केली नाही?

 

Advertisements

श्रद्धा

नुकताच एक गमतीशीर प्रसंग पाहण्यात आला. मी महामार्गाजवळ मित्राची वाट पाहात थांबलो होतो. माझ्या जवळून एक माणूस बाजूलाच असलेल्या चर्चच्या दिशेनी चालला होता.

वाट बघत कंटाळून गेल्याने आणि रस्त्यावर बघण्यासारखे काही नसल्याने मी उगाचच ह्या माणसाकडे बघत होतो. चर्चच्या दारात गेल्यावर ह्या माणसाने आपल्या चपला काढल्या आणि मेरीला नमस्कार केला. मला त्याचं ‘चपला काढण्याचं’ पहिले हसू आलं आणि मग वाईट वाटलं.

गावातल्या इतर चार चौघांसारखा दिसणारा हा इसम बहुतेक नव धर्मांतरित ख्रिश्चन होता. त्याने आपल्या पूर्वीच्या सवयीप्रमाणे चपला काढून देवाला नमस्कार केला. काही कारणाने त्याने देव बदलला होता पण देवपूजेचे जुने संस्कार मात्र त्याला बदलता आले नसावेत. ह्या धर्मात पूजा-प्रार्थना पादत्राणे घालूनच केली जाते हे बहुतेक त्याला माहिती नसावं.

सुटबुटात चर्चमध्ये शिरणाऱ्या इतर ख्रिश्चन मंडळींमधे हा नवीन ख्रिश्चन वेगळा वाटत होता. ह्या भोळ्या स-श्रध्द माणसानी आपला धर्म का बदलला असा विचार करत असतांना मित्र आला आणि मग विचारांचा तंद्री तुटली. कॅथलिक, प्रॉटेस्टंट, ऑर्थोडॉक्स आदी पंथांमध्ये विभागलेल्या आणि ३८००० पोटजाती असलेल्या धर्मात ह्याला काय वेगळा अनुभव येणार असा विचार करून मला त्या अनोळखी माणसाबद्दल वाईट वाटत राहिले.

 

मराठमोळ्या कोथरूडमधे सगळ्या इंग्रजी शाळा!

पुण्य नगरी पुणे येथे नुकताच बालकमंदीर प्रवेशाचा हंगाम (pre school admission season) सुरु झाला. विशेषतः कोथरूडमधे लोकसंखेच्या तुलनेत शाळा कमी असल्याने चांगल्या शाळांचा अर्ज घेण्यासाठी पालकांना तासंतास रांगा लावाव्या लागतात.

सगळ्यात मोठे आश्चर्य म्हणजे कोथरूड सारख्या मराठमोळ्या भागात सगळ्या चांगल्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. पालक इंग्रजी माध्यमाचा आग्रह करतात म्हणून मराठी शाळा नाहीत की मराठी शाळा नाहीत म्हणून पालक नाईलाजाने इंग्रजी शाळांकडे जातात?

नळ स्टॉपला ‘अभिनव’ ही ४-५ की.मी. दूर असलेली कोथरूडच्या ‘सगळ्यात जवळची’ चांगली मराठी शाळा. बाकी न्यु इंडिया, मेलेनिम, परांजपे, सेवा सदन, सरस्वती, स्प्रिंग डेल अश्या सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. वासुदेव बळवंत फडकेंचा वारसा सांगणारी ‘बाल शिक्षण’ शाळा देखील ‘प्युर इंग्लिश’ आहे. ह्या शाळांना मराठी माध्यम नसल्याची जरासुद्धा खंत नाही उलट आपल्या इंग्रजी माध्यमाचा गर्व आहे.

‘सेमी इंग्लिश’ हा एक चांगला व्यवहार्य पर्याय असुनदेखील पेठांबाहेरील बहुतेक शाळांमध्ये ह्याची सोय नाही (अपवाद अभिनव विद्यालय). पालक सुद्धा विनाकारण इंग्रजीचा आग्रह धरतात. ‘अभिनव इंग्लिश’साठी रांगा लावणाऱ्या बहुतांश मराठी पालकांनी ‘अभिनव मराठी’चे माहिती पत्रक देखील घेतले नाही. मराठी माध्यमातून शिकणे त्यांना बहुतेक कमीपणाचे वाटते.

आज इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, पण म्हणून मराठीचा बळी देण्याची गरज नाही असं वाटतं.

१४ नोहेंबर – प्रेम दिवस

नेहरूंना मुलं आवडायची म्हणून त्यांच्या जन्मदिवशी बाल दिवस साजरा करतात.  त्यांना लेडी माउंटबॅटन पण आवडायची, मग ह्या दिवशी प्रेम दिवस का साजरा करू नये?

बाई बाईत (माणसा-माणसात म्हणतो ना तसचं) भेदभाव न करता आंतराष्ट्रीय स्तरावर प्रेमाचा संदेश देण्याचा हा दिवस.

पामेला हिक्स (माउंटबॅटन ह्यांची कन्या) हिने आपल्या पुस्तकात नेहरू आणि तिच्या आईच्या प्रेमाचा उल्लेख केला आहे. नेहरू आणि एडविना माउंटबॅटन ह्यांना फार एकटं-एकटं वाटत होतं आणि त्यातून दोघं जवळ आले असं तिनी नमूद केलं आहे.

Reference:  India Remembered

Writers – Pamela Mountbatten-Hicks, India Hicks

Publisher- Pavilion, 2009

 

मुलं हे उद्याचे मतदार आहेत आणि त्यांना नेहरू-गांधी नावाचा विसर पडू नये म्हणून बहुतेक बालदिनाचे खुळ सुरु झाले. शाळेत असतांना ‘चाचांना गुलाब फार आवडे’, ‘चाचांना लहान मुले फार आवडत’ असे त्यांचे निरर्थक वर्णन करून ह्या दिवशी मिठाई वाटली जाई. मोठे झाल्यावर कित्येक लोकांना नेहरूंची तीच प्रतिमा लक्षात राहते आणि मग आपोआप ‘पंजावर शिक्का’ मारल्या जातो.

बाकी, ह्या नेहरू परिवाराने सर्वधर्मीय परिवाराचे एक उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवले आहे. हा त्यांचा वंशवृक्ष (वंशवेल म्हणा हवं तर)

भोपाळ आणि इंधनदरवाढ

इंधन भाववाढ हा मुद्दा सध्या सगळीकडे (म्हणजे संसदेत आणि प्रसारमाध्यमांमध्ये ) गाजतोय. केंद्रसरकारने भाववाढीची हीच वेळ निवडण्यामागे मुख्य कारण म्हणजे भोपाळ प्रकरणावरून लोकांचे लक्ष इतरत्र वळवणे. विचार करा:

२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे भारतात किमती वाढवण्याची गरज नव्हती.

५८ रुपये लिटर पेट्रोल मागचा हिशोभ ह्याप्रमाणे आसतो: मुळ कींमत रू.२९, कर आणि अधिभार रू.२३, परिवहन रु.६. ह्या भाववाढीमुळे सरकारी तीजोरीत भर पडणार आहे. विमान वाहतूक, दारू, सिगरेट्स ह्यावर कर बसवून सरकारनं तिजोरी भरता आली नसती का?

सध्या ‘चलनवाढ’ ही देशासमोर मोठी समस्या आहे. डीझेलची कींमत वाढल्याने आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अजून वाढतील. अर्थशास्त्राचे जाणकार असलेले मा. प्रधानमंत्री कुठल्या आधारावर डीझेलची कींमत वाढवून चलनवाढ आटोक्यात आणणार आहेत?

युनियन कारबाइडच्या अॅन्डरसनला पळून जायला तत्कालीन कॉंग्रेस सरकारने साहाय्य केले असे समोर येताच इंधन भाववाढ जाहीर झाली. आता विरोधी पक्ष भाववाढीविरुद्ध निदर्शनांमध्ये गुंतले आहेत आणि प्रसारमाध्यमे फुटबॉलमध्ये. सरकारने यशस्वीरीत्या सगळ्यांचे लक्ष्य ‘भोपाळ’ प्रकरणावरून भाववाढीवर वळवले आहे. काही दिवसात केंद्र सरकार ‘आम आदमी’साठी इंधन दरवाढ मागे घेण्याचा आणि विरोधी पक्ष त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्नात गुंततील.

तोपर्यंत सगळेच ‘भोपाळ दुर्घटना’ आणि कॉंग्रेस सरकारने दोषींना केलेली मदत विसरून गेलेले असतील. कदाचित २०३५ साली ह्या दुर्घटनेला ५० वर्ष झाल्याचा मुहूर्त साधून पुन्हा एकदा हा विषय चर्चेत येईल.

महिला दीन – ‘करिअर ब्रेक’ साठी ‘करिअर पाथ’

महिलांनी आपले हक्क मिळविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे स्मरण करण्यासाठी ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. महिलांची व्यावसायीक आणि सामाजीक उन्नती ही निश्तितच अभिनंदनीय आहे. पण नवीन संधी नवीन समस्या घेवून आल्या आहेत आणि अशी एक समस्या आज माझ्या मनात घोळते आहे.

नोकरी आणि कौटुंबीक जवाबदारी ह्यांमधील द्वंद्व हा काही नवीन विषय नाही. विशेषतः महिलांवर कौटुंबीक जवाबदारी जास्त असल्याने प्रसुती आणि बाल संगोपन, मुलांचे शिक्षण अश्या कारणांमुळे त्यांना तात्पुरती नोकरी सोडावी लागते. बहुतेकदा २ ते ३ वर्षानंतर पुन्हा नोकरी करायला परिस्थिती पूरक बनते. पण अश्या महिलांना परत नोकरीत घेण्याची कुठलीही व्यवस्था कंपन्यांमधे नसते. अश्या वेळी परत नोकरी मिळवणे अवघड होवून अथवा चांगली नोकरी न मिळाल्याने बहुतेक महिला नोकरीचा विचार कायमचा सोडून देतात. ह्यामुळे महिलांचे वयक्तिक नुकसान तर होतेच पण त्याबरोबर उद्योगसमूहानी विकसीत केलेले कुशल मनुष्यबळ देखील वाया जाते.

सध्या रोजगार निर्मिती जोरात असल्याने उद्योगसमूहांना कुशल मनुष्यबळाची समस्या भेडसावते आहे. अश्यावेळी महिला कर्मचाऱ्यांमधील एक वर्ग पूर्णतः दुर्लक्षित राहतो हा केवढा विरोधाभास! गेल्या काही वर्षात कंपन्यांमध्ये ह्या विषयी थोडी जागरूकता निर्माण झाली आहे. आणि कौटुंबीक जवाबदारी पार पाडण्यासाठी ‘फ्लेक्झी अवर्स’ आणि ‘घरून काम’ अश्या सुविधा महिला कर्मचाऱ्यांना मिळण्यास सुरवात झाली आहे. पण मोठा ‘करिअर ब्रेक’ घेणाऱ्या वर्गाची समस्या ह्याने सुटत नाही.

ह्यावर एक चांगला उपाय म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये/ कंपन्यांमध्ये ‘पुनर्प्रवेश’ कार्यक्रम हाती घेणे. कंपन्यांनी अशी व्यवस्था निर्माण करावी की ज्यात मोठा ‘करिअर ब्रेक’ घेणाऱ्या महिलांसाठी वेगळे ‘करिअर पाथ’ उपलब्ध असतील. ह्यामुळे ‘करिअर ब्रेक’ घेणे आणि करिअर पुनः सुरु करणे सुलभ होईल. विशेषतः माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये ‘तांत्रिक आणि व्यवस्थापन’ असे दोन भिन्न ‘करिअर पाथ’ स्पष्टपणे नमूद केलेले असतात. त्यामुळे ‘HR’ ला असे ‘करिअर पाथ’ तयार करणे सहज शक्य आहे. गरज आहे ती इच्छाशक्तीची!

आणि हे काही स्वप्नरंजन नव्हे. काही कंपन्यांनी हे यशस्वीरीत्या करून दाखवले आहे. उदा. GE ह्या अग्रगण्य कंपनीने २००८ साली बंगरूळ मध्ये नोकरी सोडलेल्या उच्च शिक्षित महिलांसाठी ‘ReStart’ नावाचा कार्यक्रम राबवला. त्यात त्यांना उच्च तांत्रिक ज्ञान असलेल्या १००० पेक्षा जास्त महिलांकडून प्रतिसाद मिळाला. हरियाणा सरकारने नुकतीच महिला कर्मचाऱ्यांसाठी २ वर्षांची ‘बाल संगोपन’ रजेची सुविधा जाहीर केली आहे. हे उपक्रम स्तुत्य असून अश्या सुविधा इतर कंपन्यामध्ये उपलब्ध व्हायला हव्यात. कर्मचाऱ्यांनी हा विषय लावून धरला तर पुढच्या महिला दिनाआधी अशी सुविधा आणखी कितीतरी कंपन्यांमध्ये उपलब्ध होवू शकतील. तान्ह्या मुलांना पुरेसा वेळ देवू न शकण्याची खंत बाळगणाऱ्या कितीतरी महिलांना ह्यामुळे मोठा आधार मिळेल. 

राष्ट्रभक्तीचा संच-उपसंच

उद्या २६ जानेवारी. आपला गणतंत्र दिवस. राष्ट्रप्रेमाच्या नावावर ह्या विक्री आणि विपणन संधीचा पुरेपूर फायदा समाजातले वेगवेगळे घटक करून घेणार आहेत. उदा. दूरचित्रवाणीवर वेगवेगळे चित्रपट आणि गाण्याचे कार्यक्रम होतील, राजकीय नेते सांस्कृतिक मेळावे भरवतील, मॉल्समध्ये ह्या दिवशी खरेदीवर भव्य सुट असेल, आणि काही ‘राष्ट्रवादी’ मंडळी ह्या निमित्त दारू पिऊन रस्त्यावर शक्ती प्रदर्शनाचा धिंगाणा घालतील.

स्वतंत्र भारत देशाची राज्यघटना ह्या दिवशी अस्तित्वात आली आणि म्हणून आपण हा दिवस साजरा (?) करतो. वरील कार्यक्रम ह्या दिवसाला कितपत सुसंगत वाटतात? आणि मुळात आपली राष्ट्रभक्तीची व्याख्या काय? तिरंगा झेंडा शर्टावर किंवा गाडीवर लावणे? थोडा वेळ राष्ट्रभक्तीपर गाणे ऐकणे? क्रिकेटमध्ये भारत जिंकल्यावर आनंदित होणे?

ह्या गोष्टी राष्ट्रभक्तीचा केवळ एक छोटासा उपसंच आहेत आणि आपल्या सर्वांमध्ये तो एक समान दुवा आहे, गणितात मसावी असतो तसा. पण राष्ट्रभक्तीचा परीघ ह्यापेक्षा कितीतरी मोठा आहे.  उदा.

  1. चीन हे आपलं शत्रू राष्ट्र आहे ह्यात काही वाद नाही. तरीही आपण चीनी वस्तू विकत घेतो आणि शत्रूराष्ट्राला मदत करतो. काही भ्रष्ट अधिकारी निकृष्ठ दर्जाचा चीनी माल आयात करायला परवानगी देतात आणि आपण त्या बाबतीत काही फार करू शकत नसलो तरी निदान त्या वस्तू विकत न घेऊन आपण देशाचं आर्थिक आणि पर्यावरणाचं नुकसान टाळू शकतो.
  2. आज आपल्याला पाणी आणि विजेची समस्या भेडसावते आहे. मुंबई पुण्याला ही समस्या उग्र नसली तरी इतर ठिकाणी १२ तास वीज अधिनियम आहे. काही ठिकाणी आठवडयातून एकदा पाणी येतं. अश्या परिस्थितीत आपण निदान वीज आणि पाण्याचा अपव्यय टाळू शकतो ना?
  3. सार्वजनिक अस्वच्छता हा काही नवीन विषय नाही. केवळ पान थुंकणारे ह्याला जवाबदार धरले जातात. कार मधून रस्त्यावर प्लास्टीक आणि शीतपेयांच्या बाटल्या भिरकावल्या जातात. अलिबागच्या किनाऱ्यावर दारूच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. हे आपल्यातलेच काही सुशिक्षित लोक करत असतात.    
  4. भ्रष्ट्राचाराविरुद्ध आपण सगळे ओरडत असतो पण रेल्वेमध्ये जागा मिळवायला किंवा वाहतूक पोलिसांना चिरीमिरी देवून आपली सुटका करून घेणारे आपल्यातलेच असतात ना?

 कितीतरी साध्या सोप्या गोष्टींचा विचार करून देशासमोर असलेल्या काही ठळक समस्या (त्यात भर न घालता) सोडवण्यासाठी आपण आपला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. आपल्या कृतीतून समाजाचे किंवा देशाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही अशी आपण खबरदारी घ्यायला हवी. राष्ट्राभाक्तीला पूरक असलेल्या आपल्या कृतींवर समाधान न मानता आपण आपल्या राष्ट्रभक्तीचा परीघ वाढवायला हवा. एक सुजाण आणि जवाबदार नागरिक बनून राष्ट्रभक्तीच्या शिडीवर आपण एक पायरी आणखी वर जाण्याचा आज संकल्प करुया. जय हिंद!